आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 30 - दरवर्षी ऊस हंगामापूर्वी किंवा नंतर येणारा दिवाळीचा सण यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच आला असल्याने ९० टक्के तोडणी कामगार त्यांची दिवाळी गावाकडेच साजरी करणार आहेत. त्यामुळे काही कारखाने वगळता जिल्ह्यातील सर्वच कारखाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर गाळपाचा प्रत्यक्षात प्रारंभ करणार आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून शेकडो मैल सर्वकाही सोडून सहा ते आठ महिन्यांसाठी ऊसतोड कामगार आता जिल्ह्यात ऊसतोड करण्यासाठी दाखल होऊ लागला आहे. सर्वाधिक कष्टाचं काम करूनही अत्यल्प पैशावर राबणारा ऊसतोडणी कामगार यांत्रिक युगातही कारखान्यासाठी महत्त्वाचा घटक बनला आहे. चोवीस तास काम करताना सर्व सुख-दु:ख विसरून हा कामगार काम करत असतो.
या काळात येणारे अनेक सण साजरे करता येत नाहीत. दिवाळीचा सण आपल्या घरी नातेवाइकांमध्ये साजरा करावा, अशी तोडकºयांची इच्छा असली तरी अनेकदा दस-यानंतर लगेचच अनेक कारखाने गाळपाचा प्रारंभ करत असल्यामुळे हा कामगार आत्तापर्यंत उसाच्या फडातच दिवाळी साजरा करत आला.
पहाटेच्या वेळी गाव वेशीवर किंवा शेत शिवारात आकाशात वाजणारे फटाके पाहत आमची मुलंही फटाक्यासाठी हट्ट करतात. मात्र, या मुलांचा हट्ट आम्हाला पुरवता येत नाही. दुसºयाच्या शेतात फटाके वाजताना चुकून आग लागली तर हे नुकसान भरून देणं आम्हाला कधीच शक्य नसतं, अशी भावना तोडकरी बोलून दाखवतात.
खरंतर हा कष्टकरी अनेक गोष्टीपासून वंचित आहे. काम करणा-या प्रत्येक कामगाराला दिवाळीला बोनस मिळतो; मात्र आजपर्यंत कोणत्याही कारखान्याकडून या तोडणी कामगाराला बोनस मिळाला नाही. ऊसतोड करणाºया पती-पत्नीला मिळून २२० रुपये टनाप्रमाणे हजेरी मिळत आहे. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाप्रमाणे दर मिळावा, यासाठी सहायक कामगार आयुक्त महत्त्वाची भूमिका घेतात. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, यासाठी लक्ष देतात, मग ऊस तोडकामगारांबाबत त्याला मिळणाºया वेतनाचा कोणी प्रश्न उपस्थित का करत नाही? हा मुख्य प्रश्न आहे.
यंदाचा गाळप हंगाम शासनाच्या धोरणाप्रमाणे ५ नोव्हेंबरपासून सुरूकरावा, असे जाहीर असले तरी हंगामात उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे हंगाम केवळ ८० ते १०० दिवसच चालणार असल्याने १५ नोव्हेंबरनंतरच हंगामास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)