मुंबई-
राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत. त्यात ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यूची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच टोपे यांनी तशी गरज नेमकी केव्हा निर्माण होईल याची माहिती दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. पण कोरोना संसर्गाची गती तर अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्र्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनांवर आणावी लागेल, असंही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारला निर्बंध लावायचे नाहीत. तसा आमचा हेतू देखील नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. त्यामुळे निर्बंधांबाबत चुकीचा अर्थ काढू नये आणि आरोग्याच्या स्पिरीटनं त्याकडे पाहावं, असं राजेश टोपे म्हणाले.