मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. केवळ ईव्हीएमच्या बळावर भाजप निवडून येत असून मिळालेल्या बहुमताचा गैरवापर करत असल्याचा आरोप राज यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपच्या व्होटबँकेला मराठीचा मुद्दा समोर करत सूचक इशारा दिला आहे.
मनाला वाटेल तसे निर्णय भाजप घेत आहे. स्पष्ट बहुमत असल्यामुळे ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. महिती अधिकाराच्या कायद्याच्या बाबतीतही तसच करण्यात येत आहे. मोदी-शाह जोडी ही अत्यंत घातक असून ही जोडी कधी तुमच्यापर्यंत पोहचेल कळणारही नाही. राज ठाकरे यांनी यावेळी विविध राज्यांच्या प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच भाजपला प्रादेशिक अस्मितेचे काहीही घेणं देणं नसल्याचे राज यांनी म्हटले.
काही जातींचा भाजपला न मागता पाठिंबा असतो, हे देखील राज यांनी अधोरेखीत केले. भाजपचा वरवंटा जेंव्हा तुमच्यावर फिरेल तेंव्हा हे पाहिले जाणार नाही की, तुम्ही ब्राह्मण, सीकेपी, माळी किंवा साळी आहात का, भाजपने पक्षातील लोकांना सोडले नाही, तर तुम्ही काय लागून गेलात असा गर्भित इशाराही राज यांनी दिला.
राज्याच्या राजकारणात सध्या दलित आणि मुस्लीम मतदारांचा कल प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे आहे. मराठा मतदार भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विभागलेले आहेत. तर उच्च वर्णीय मते भाजपची व्होटबँक आहे. त्यामुळे राज यांनी भाजपच्या धोरणाचा हवाला देत भाजपचा वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहिली जाणार नाही, तर तुम्ही मराठी आहात का, हे पाहिले जाईल असंही सांगितले.