चंद्रपूर : राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. मराठा समाजाला आरक्षण आणि अॅक्ट्रॉसिटी अॅक्टमध्ये बदल करण्याची मागणी या मोर्चातून होत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, दलितांचे आरक्षण बदलण्याच्या मागणीसाठी कितीही मोठे मोर्चे निघाले, तरी मान्य होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.साठाव्या धम्मचक्र अनुवर्तन महोत्सवासाठी मुख्य पाहुणे म्हणून रामदास आठवले चंद्रपुरात आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘अॅक्ट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर होऊ नये. खऱ्या आरोपींना शिक्षा व्हायलाच व्हवी. कोणत्याही घटनेत अत्याचार करणाऱ्यांची जात पाहिली जात नसून, प्रवृत्ती जबाबदार असते. अशा चुकीच्या प्रवृत्तींना पायबंद घातलाच पाहिजे.’पूर्वी मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले. तेव्हा ते स्वत:ला मागास समजायला तयार नव्हते. अलीकडे मात्र सर्वांनाच आरक्षण हवे आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी आठवले यांनी या वेळी विरोध दर्शविला.मराठा समाजाला ५० टक्क्यांमध्ये २५ टक्के आरक्षणाची वाढ करून न्याय देता येईल. मात्र, यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. केंद्र सरकार कायदा करेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)>... आमच्या स्टाईलने मोर्चा महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण मराठा-दलित संघर्षाच्या दिशेने चालले असे आपणास वाटत नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आॅगस्ट क्रांतीदिनापासून राज्यात मराठ्यांचे मोर्चे निघत आहे. ते त्यांच्या स्टाईलने मोर्चे काढत आहेत. राज्यात एकदोन ठिकाणी दलितांचे मोर्च शांतेतेच्या मार्गाने निघाले आहेत. गरज पडली तर आम्हीही आमच्या स्टाईलने मोर्च काढू.
कितीही मोठे मोर्चे निघाले; तरी दलितांचे आरक्षण बदलणार नाही!
By admin | Published: October 17, 2016 3:59 AM