मुंबई - भाजपाने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आज राज्यसभेसाठी मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
"आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपील केले आहे. निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी अपेक्षा आहे" असेही जयंत पाटील म्हणाले. सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.