मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घरांवर अशी आंदोलनं अजिबात समर्थनीय नसल्याचं म्हटलं.
"ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो," असं फडणवीस म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेकयावेळी अनेक संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारचा निषेध केला.