अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी लाट आहे, असे समजू नका, असे सांगत प्रचाराला लागण्याचे आदेश दिले होते. यावरून विरोधकांनी राणांचा हाच मुद्दा उचलून धरला होता. यावरून वातावरण तापतेय हे लक्षात येताच राणा यांनी पलटी मारली आहे.
माझे विधान मोडून-तोडून दाखविण्यात आल्याचा दावा राणा यांनी केला आहे. देशात मोदींची लाट आहे आणि राहणार असे त्या म्हणाल्या. देशाच्या प्रगतीसाठी मोदींची गरज आहे. विरोधकांनी हे वक्तव्य मोडून-तोडून दाखविले, असा आरोप त्यांनी केला.
राणा यांच्या वक्तव्यामुळे मोदी लाट असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राणा खरे बोलत असल्याचे म्हटले होते.
राणा नेमके काय म्हणालेल्या...ही निवडणूक अशी लढवावी लागेल की ग्राम पंचायतची आहे. आपल्याला सर्व मतदारांना दुपारी १२ पर्यंत मतदान बुथवर आणावे लागेल व त्यांना मतदान करा असे सांगावे लागेल. जर कोणाला वाटत असेल की मोदी लाट आहे तर लक्षात ठेवा २०१९ मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते, असे राणा म्हणाल्या होत्या. म्हणजेच मोदी लाट वगैरे काही नाही, मी अपक्ष निवडून आले होते, असे त्यांना म्हणायचे होते. या विधानावर त्या फसल्या आहेत.