मुंबई : कोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु मुंबईतील एकही पूल धोकादायक नसल्याचा दावा महापालिकेने शुक्रवारी केला. त्याचवेळी या पुलांच्या स्थैर्याची मात्र चाचपणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.पुलांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे मुंबईतील ३४ पूल धोकादायक ठरविण्यात आले होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नेमण्यात येणार होता. मात्र २०१४ सालापासून कारवाई झाली नाही. महाडमधील दुर्घटनेनंतर महापालिकेची झोप उडाली आहे. त्यामुळे लपवाछपवीचा कारभार सुरू असून, ब्रिटिशकालीन पुलांची खबरही प्रशासनाला नाही. याउलट एकही पूल धोकादायक नाही, असा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, पुलांसाठी सल्लागार नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलांचे स्थैर्य लवकरच तपासण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. शहरातील पुलांसाठी सल्लागार म्हणून पी.डी. देसाई असोसिएट्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ६३ लाख १८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरांतील पुलांसाठी ‘सी. व्ही. कांड’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना १ कोटी ५ लाख देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईतील एकही पूल धोकादायक नाही
By admin | Published: August 06, 2016 1:39 AM