ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना पासपोर्टवरील आपले नाव बदलण्याची गरज नाही, अशी घोषणा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. आई-वडिलांचे नाव देऊन या महिला आपले प्रवासाचे कागदपत्रे प्राप्त करू शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे. पासपोर्टच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. महिलांना आता विवाहाचे किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पासपोर्टवर महिलेच्या आई किंवा वडिलांचे नाव आता असणे गरजेचे हवे. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना मोदी म्हणाले की, महिलांना सशक्त करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुद्रा लोनचे 70 टक्के कर्ज महिला व्यावसायिकांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत महिलेच्या नावावर घर नोंदणी करण्यास प्राधान्य दिले आहे. सरकारने अनेक योजनांत महिलांना पहिला अधिकार दिला आहे. उज्ज्वला योजनेतून अनेक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले असून, दोन कोटी महिलांची चुलीच्या धुरापासून मोकळीक होणार आहे. महिलांच्या मातृत्व रजेचा कालावधी 12 आठवड्यांऐवजी आता 26 आठवडे करण्यात आला आहे. गर्भवती महिलेच्या बँक खात्यात 6000 रुपये टाकण्यात येणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे. मोदी म्हणाले की, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक कोटींपेक्षा अधिक बँक खाते उघडण्यात आले आहेत. जिथे महिलांना संधी देण्यात आली तिथे त्यांनी दाखवून दिले की, त्या पुरुषांपेक्षा दोन पाऊले पुढे आहेत. डेअरी आणि पशुधन क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे.