Sanjay Shirsat : बदलापूरात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेतला आणि राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यभरात मविआकडून मूक आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडूनीही मविआविरोधात आंदोलन केलं. मात्र आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिकात्मक आंदोलनाची गरज नव्हती असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. असं विधान करुन आमदार संजय शिरसाट यांनी मित्रपक्षांना घरचा आहेर दिला आहे.
महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात राज्यभरात सत्ताधारी पक्षांनीही आंदोलने केली. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी सत्ताधारी पक्षांनी केलेल्या आंदोलनावरुन सुनावलं आहे. राज्यभरात भाजपसह शिंदे गटानेही मविआच्या आंदोलनाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी आंदोलने केली. मुंबईत भाजप नेते आशिष शेलार आणि चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी हे विधान केलं.
"सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केले मला वाटतं त्याची गरज नव्हती. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. जेव्हा आपण सरकारमध्ये असतो तेव्हा आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत नेण्याची आपली जबाबदारी असते. आणि ते काम आपण करत आहोत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन करणे उचित आहे की नाही हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे होतं. त्याच्यावर मी भाष्य करणार नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव - चित्रा वाघ
"बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. पीडित कुटुंबाची मानसिक स्थिती आपण समजू शकतो. परंतु, महाविकास आघाडी या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. आज त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना दाखवण्यासाठी आणि त्यांनी काय केले हे दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव आहे, पण जनता त्यांना हे करू देणार नाही. सरकार कृतीत उतरले आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या.