मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बोर्डिंग पासवर शिक्का मारून घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. टर्मिनल २ वरून ‘डीजी यात्रा’द्वारे पूर्णत: स्वयंचलित असलेल्या लाइव्ह पॅसेंजर डाटासेटच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने याबाबत गतवर्षी योजना जाहीर केली होती. ही योजना लागू झालेले हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे.
देशांतर्गत प्रवास करणारे प्रवासी विमानतळावरील प्री एम्बार्केशन पॉइंट येथील सुरक्षा तपासणीमध्ये ‘ई’ गेट रीडरवर त्यांच्या मोबाइलद्वारे बोर्डिंग पासवरील क्यूआर कोड किंवा बारकोड स्कॅन करू शकतील. त्यानंतर त्यांना पुन्हा बोर्डिंग पासवर शिक्का मारून घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) द्वारे होणाºया सुरक्षा तपासणीनंतर प्रवाशांना त्यांच्या बोर्डिंग पासवर शिक्का मारून घ्यावा लागतो व त्यासाठी रांग लावावी लागते. या निर्णयामुळे सीआयएसएफ जवानांच्या कामाच्या ताणातदेखील घट होणार आहे.
प्रवाशांना विमानात प्रवेश करण्यापूर्वी विविध प्रक्रियांसाठी कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे रांग कमी होईल व प्रवाशांना विनासायास आतमध्ये जाण्यास मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मुंबईविमानतळावर सेल्फ सर्व्हिस चेक इन सुविधा मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या आहेत.