मुंबईः उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. दरम्यान, पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. तसेच, सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना लगावला आहे.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे नीलम गोल्हे म्हणाल्या. याचबरोबर, उपस्थित पत्रकारांनीसुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सुषमा अंधारे पक्षात येताच त्यांना उपनेते पद दिले गेले. यानंतर ठाकरे गटाच्या महिला आघाडीत प्रचंड नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली. सुषमा अंधारे यांना दिलेले अतिरिक्त महत्व अनेकांच्या पचनी पडलेले नाही. त्यातून महिला पदाधिकाऱ्यांची नाराजी वाढत गेली. त्याचा परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात सामील झाल्या. यानंतर आता निलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी याबाबत बोलताना महिला आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नसून ही भाजपकडून पिकवलेली कंडी असल्याचे म्हटले होते.