छत्रपती संभाजीनगर – आतापर्यंत शरद पवार कुठलीही चौकशी सुरू झाली तर यात राजकारण आहे असं म्हणायचे. परंतु कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसून सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणाही बद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी करायला पाहिजे. आता हे आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे बघून हे विधान केले की काय हे तपासले पाहिजे. आता जेव्हा चौकशी होईल तेव्हा रडायचं नाही. आम्हाला त्रास दिला जातोय असं न म्हणता चौकशीला सामोरे जायचे आणि उत्तरे देऊन त्यातील सत्य काय हे बाहेर येऊ द्यायला मदत करायची असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना लगावला आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर काहीच चर्चा होणार नाही. लालूप्रसाद यादव म्हणतात मोदींच्या नरडीवर बसायचंय, पण ही मुंबई आहे, २०२४ च्या निवडणुकीत या सर्वांना तिरडीवर घेऊन लोकं जातील. नरडीवर बसण्यासाठी तुम्ही एकत्र येतायेत, देशाच्या विकासासाठी एकत्र येत नाहीत. नरेंद्र मोदींना हटवणे हा एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. संजय राऊत यांना पाहून यंत्र घाबरतात, माणसं घाबरतात, पक्षातील लोकंही इतके घाबरतात की त्यांना सोडून गेले. संजय राऊतांजवळ राहिले तर करटं लागतो असा त्यांचा समज आहे अशी टीकाही त्यांनी केली.
त्याचसोबत शरद पवार यांनी निवृत्त व्हावं ही सायरस पूनावाला यांची इच्छा होती असं नाही. त्यांच्याच पक्षातील लोकांनीही हे सांगितले होते. त्यासाठीच पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु माणूस मोहमायेपासून मुक्त होऊ शकत नाही. आता मित्राने सल्ला दिला. आता मित्राचा सल्ला ऐकायचा की नाही हे मी सांगू शकत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट १२ ठिकाणी झाले पण १३ वे ठिकाण कपोकल्पित का सांगितले त्याचे उत्तर शरद पवारांकडेच आहे माझ्याकडे नाही असं म्हणत मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
पंतप्रधानपदाचा उमेदवार का ठरवत नाही?
पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार का ठरवत नाही? देश प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी ही आमची ब्ल्यू प्रिंट आहे हे सांगावे. देशाला विश्वगौरव बनवायचे की देश अधोगतीच्या मार्गाने न्यायचा हे जनतेने ठरवायचे आहे असं सांगून मुनगंटीवार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले होते शरद पवार?
मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरीगेशन घोटाळा या दोन गोष्टी कटाक्षाने सांगितल्या. माझा प्रधानमंत्र्यांना एकच आग्रह आहे. ते प्रधानमंत्री आहेत, देशाचे. जिथं सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तूस्थिती समाजासमोर ठेवावी, अशी मागणीच शरद पवार यांनी केली आहे.