ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - बलुचिस्तानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या किंकाळ्या लाल किल्ल्यावर ऐकू येतात, पण इकडे आमच्याच देशातील मराठी सीमा बांधवांचा ६० वर्षांपासून सुरू असलेला आक्रोश ऐकू जात नसेल तर न्याय व अन्यायाच्या फालतू गोष्टी कोणी करू नयेत असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
राज्यात भाजपाचे राज्य आल्यापासून विदर्भवाद्यांनी उचल खाल्ली व महाराष्ट्र दिन हे लोक काळा दिवस (चार-पाच टाळकी) साजरा करतात म्हणून त्या काळतोंड्यांचे पार्श्वभाग आमच्या पोलिसांनी सोलून काढले नाहीत हेदेखील जरा समजून घ्या असा निरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना द्या असा टोला उद्धव ठाकरे यांनी मारला आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असं आवाहनही केलं आहे.
काळे फेकण्याची व हल्ले करण्याची क्षमता महाराष्ट्राच्याही मनगटात आहे आणि कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी ते करून दाखवलेच आहे. मराठी सीमा बांधवांवर अत्याचार करणार्या कानडी मंडळींनी हे लक्षात घ्यावे. कावेरी पाणी प्रश्नावरून रण पेटले तेव्हा तामीळनाडूतील कानडी वस्त्यांवर भयंकर हल्ले झाले होते. म्हणजे मनगटे व अस्मिता सगळ्यांनाच आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
मराठी बांधवांचा लढा संपला नसेल तर मायबाप सरकारने त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व न्याय द्यायला हवा, पण येथे रोज घडते आहे ते उलटेच. कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस तेथील मराठी संघटनांनी काळा दिवस पाळला याचे सालाबादप्रमाणे निमित्त करून कानडी पोलिसांनी जो अमानुष हैदोस घातला त्याचा फक्त धिक्कार करून चालणार नाही. या असल्या पोलिसी पशूंवर मानवी हक्काच्या उल्लंघनांचे खटलेच दाखल करायला हवेत व याकामी महाराष्ट्राच्या मराठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
कुठे आहेत आमचे ते श्री. अण्णा हजारे? सीमा बांधवांवरील अन्यायाविरोधात एखादे उपोषण त्यांनी रामलीला मैदानावर केले तर महाराष्ट्राचे हुतात्मे त्यांच्यावर फुलेच उधळतील, पण बेळगावात इतके भयंकर अत्याचार सुरू असताना एकही माय का लाल आपली कूस बदलायला तयार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.