नवी दिल्ली : नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना आपण भेटलो आणि त्यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता कोणताही अडथळा नाही. तो यथावकाश होणार आहे, असे ते म्हणाले.
नीती आयोगाची बैठक आणि नव्या संसद भवनाच्या राष्ट्रार्पण समारंभासाठी मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी रात्रीपासून दिल्लीत असून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह ते कोणाकोणाच्या भेटी घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री रविवारी सायंकाळपर्यंत दिल्लीत आहेत. उद्या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सहभागी होणार काय, तसेच मोदी आणि शाह यांच्यासोबत स्वतंत्रपणे भेट होणार काय, यावर त्यांनी भाष्य केले नाही.
देहबोली सकारात्मक सुप्रीम काेर्टाचा अनुकूल निकाल लागल्यानंतर प्रथमच दिल्लीत आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची देहबोली अतिशय सकारात्मक होती. केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्रिपदांची अपेक्षा आहे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले. रात्री मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.