भाजपाकडून ऑफरवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; पृथ्वीराज चव्हाणांना दावा खोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:18 PM2023-08-16T14:18:17+5:302023-08-16T14:19:03+5:30
आम्ही राहुल गांधी, सोनिया गांधीशी बोलू. आम्ही संसदेत काँग्रेससोबत बसतो असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
मुंबई – शरद पवार-अजित पवार भेटीनं राज्यातील राजकीय वातवरण चांगलंच तापलंय. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी दोन्ही नेते भेटले. या भेटीत अजित पवारांच्या माध्यमातून भाजपानं शरद पवारांना मोठी ऑफर दिल्याचे बोलले जाते. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटानेही काका-पुतण्याच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता आम्हाला कुठलीही ऑफर आली नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाचे चेअरमन देण्याची भाजपाची ऑफर आहे. त्याचसोबत सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना मंत्री बनवणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला कोणतीही ऑफर नाही मी स्पष्ट शब्दात सांगते, काँग्रेस काय विधान करते हे मला माहिती नाही. शरद पवार आणि मी विधान केलेले नाही. मला ऑफरबाबत काही माहिती नाही. आम्ही राहुल गांधी, सोनिया गांधीशी बोलू. आम्ही संसदेत काँग्रेससोबत बसतो. त्यांच्यसोबत रणनीती बनवतो. त्यांच्या राज्यातील नेतृत्वाबाबत बोलणे उचित नाही. मी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर काही टिप्पणी करणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच १५ ऑगस्टचं सगळीकडे सेल सुरू आहे. त्याच ऑफर मला माहिती आहे. बाकी कुठलीही ऑफर माहिती नाही. काँग्रेसनं जी विधाने केलीत त्यावर तेच बोलू शकतात. आम्ही मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत सातत्याने चर्चा करतो. संसदीय कामकाजाबाबत कायम रणनीती ठरवतो असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
शरद पवार-अजितदादा भेटीवर प्रश्नचिन्ह
अजित पवार-शरद पवार भेटीवर काँग्रेस नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार-अजित पवार यांची गुप्त भेट आम्हाला मान्य नाही. पक्षासाठी हा चिंतेचा विषय आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. इंडिया आघाडीत यावर चर्चा होईल. त्यामुळे माझे यावर बोलणे योग्य ठरणार नाही असं त्यांनी सांगितले. तर माझ्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी अजित पवारांसमोर अट ठेवलीय, शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकतो. त्यामुळे भेटीगाठी करून दया, याचना सुरू आहे. संभ्रमाची स्थिती दूर व्हायला हवी असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.