काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकला होता. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रूपये दरमहा जमा करण्यास सांगितले होते असा दावा केला होता. यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं आजवर केलं आहे, असं वक्तव्य माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलं आहे.
"माझ्या कारकिर्दीत शंकरराव चव्हाण असेपर्यंत अॅडमिनिस्ट्रेशन खाली गेलं नव्हतं आणि मध्ये सुद्धा प्रामाणिक गृहमंत्री आले आहेत. पण सामान्यपणे कोणताही राजकीय पक्ष असू दे पोलिसांकडून वैयक्तिक किंवा पक्षाचं काम करून घेण्यावरच भर होता. आपले लोक कोणतीही पक्ष असो ती व्यक्ती प्रोफेशनल आहे किंवा नाही यावर न जाता माझा माणूस पदावर आला पाहिजे हा विचार होता. करप्शन, पॉलिटिक पॅट्रेनेच प्रत्येक राजकीय पक्षानं केलं आहे," असंही बोरवणकर म्हणाल्या. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.
"काही राजकीय नेत्यांनी येरवडा पोलीस स्टेशनची जी जागा होती त्यावर समिती स्थापन केली होती. आता येरवडा पोलीस स्थानक मध्यावर आलं आहे. त्यावेळी ते एका बाजूला होतं. म्हणजे २ एकर जागा आणि अन्य जमीन हे सोनं होतं. ते काही खासगी लोकांना देण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी मी ती जागा देणार नसल्याचं म्हटलं. आपण त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर किंवा पोलीस कार्यालय उभं करू शकतो असा विचार केला होता. कारण एकदा जागा दिली की ती पुन्हा मिळणार नाही. जेव्हा मी ती जागा दिली नाही तेव्हा त्यावेळच्या मंत्र्य़ांनी टीव्हीवर येऊन आम्हाला त्या कमिशनरांचं काहीतरी करावं लागेल असं सांगितलं होतं," असा एक किस्साही त्यांनी सांगितला. असं अनेकदाही झालं की आम्ही सल्ला दिला आणि मंत्र्यांनी कामही केलं. असे दोन्ही अनुभव आम्हाला आले असंही त्या म्हणाल्या. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलीस अधिकारी आहेत. ते त्याप्रमाणेच वागत आहेत. तेदेखील बदलण्याची आवश्यकता असल्याचं बोरवणकर यांनी सांगितलं. एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव खराब करू नयेकाही पोलीस किंवा अधिकारी चुकीचं काम करतात म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस चुकीचं काम करतात असा समज चुकीचा आहे. काही दिवसांपूर्वीच बाहेरच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आम्ही तर मुंबई पोलिसांना स्कॉटलंड पोलीस म्हणून पाहायचो पण तुमचे हे हाल झाले. हे ऐकून दु:ख झालं. एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीसांचं नाव खराब करू नये, असंही सचिन वझेंच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या. आपल्याला ज्यातून बाहेर पडायचं आहे त्यावर आपण दोष देत न बसता त्यावरील उपाय शोधले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं.