शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 02:09 PM2019-11-10T14:09:47+5:302019-11-10T14:12:10+5:30
राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा जोरात आहेत.
मुंबई - भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा जोरात आहेत. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे विचारणा केली असता आघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलटणी देणारे संकेत जयपूरमधून येत आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज जयपूरमध्ये बैठकसुरू आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांमध्ये एकमत झाले. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र सद्यस्थितीत याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.