केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 06:43 PM2019-12-14T18:43:07+5:302019-12-14T18:59:22+5:30

सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी  ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

No one becomes 'Gandhi' just because last name is Gandhi; | केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

googlenewsNext

मुंबई - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून माफी मागण्यास ठामपणे नकार देणाऱ्या राहुल गांधींवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे सावरकरांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी  ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात की, ‘’काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !’’



’’स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे,’’ असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

महिलांवर होणाऱ्या आत्याचारांवरून सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपकडून लोकसभेत लक्ष्य करण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या मागणीचा  राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन केंद्र सरकारला डिवचले होते.  

राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या 'भारत बचाव' सभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत भाजपवर हल्ला चढवला. भाजपकडून माफीच्या मागणीचा समाचार घेत ते म्हणाले की, 'माझं नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही. मी सत्यासाठी कधीही माफी मागणार नाही. 

Web Title: No one becomes 'Gandhi' just because last name is Gandhi;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.