मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, ''आज खरे बाळासाहेबांच्या विचारांवर घडलेले शिवसैनिक सोबत आले आहेत. बाळासाहेब ज्या रुबाबावर जगले, त्याचा एक टक्काही उद्धव ठाकरेंना जमले नाही. फक्त ठाकरे आडनाव घेऊन माणूस ठाकरे होत नाही, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव आणि आदित्य ठाकरे,'' अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.
''आज अतिशय आनंद होत आहे. एक कंटाळवाणे सरकार गेले. राज्यातील जनताही खुश आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जनता फडणवीसांनाच मुख्यमंत्री मानत होती. आता लवकरच शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईल, ते खरंच आले आहेत. आता पुढील अनेक वर्षेच आमचीच सत्ता असेल,'' अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा करताच ताज हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जोरदार घोषणबाजी करण्यात आली.