Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:37 AM2019-08-07T11:37:45+5:302019-08-07T11:39:18+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला शोक अन वाहिली श्रध्दांजली
सोलापूर : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
सुषमा स्वराज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या होत्या त्यांनी संसदेत केलेलं काम कोणालाही विसरता येणार नाही धाडसी महिला म्हणून भाजपामध्ये त्या सुपरिचित होत्या़ सर्वच पक्षातील नेत्यांशी सुषमाजींचे सलोख्याचे संबंध होते़ त्यांच्या पक्षात त्या खूपच लोकप्रिय होत्या त्यांची मंत्रिपदाची कारकीर्दही खूप चांगली राहिली आहे.
काही महिन्यांपासून त्या आजारी असल्याची माहिती होती, आज अचानक सुषमाजींचे निधन झाल्याची बातमी समजली धक्काच बसल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे़
सुषमा स्वराज देशातील अशा नेत्या होत्या ज्यांचा मित्रपरिवार सगळ्या पक्षात होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. सुषमा स्वराज यांच्या निधनाचं मी दु;ख व्यक्त करतो आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी प्रार्थना करतो असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.