ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - निव्वळ बारशाला घुगऱ्या वाटल्यानं कोणी बाळाचे बाप होऊ शकत नाही, अशा शब्दांत जीएसटीवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपवर शरसंधाण केलं आहे. जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडल्यानंतर विखे पाटील यांनी विरोधी पक्षांची बाजू विधिमंडळासमोर ठेवली आहे.
यावेळी विखे-पाटील यांनी भारतात जीएसटी लागू झाला पाहिजे, यासाठी 2011मध्ये यूपीए सरकारने प्रयत्न केल्याची आठवण करून दिली. मात्र तेव्हाच्या विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्याला कडाडून विरोध केला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीविरोधात त्यावेळी टोकाची भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचे महत्त्वपूर्ण विधेयक अंमलात आणण्याचा निर्णय, हे भाजपला उशिराने सूचलेले शहाणपण आहे, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.
जीएसटीबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, दरसमानता व भाववाढीवर नियंत्रण ठेवून सुसूत्रता आणणे, करप्रणाली सुलभ करणे, हा या मागील मूळ उद्देश आहे. जीएसटीचा कमाल दर 18 टक्के आणि तोसुद्धा निश्चित असायला हवा. केंद्र-राज्यात किंवा दोन राज्यांतर्गत काही वाद निर्माण झाले तर ते सोडवायला एखादी यंत्रणा असली पाहिजे. करदात्याची नव्या कायद्यानुसार नोंदणी, ऑनलाईन विवरण पत्रे दाखल करण्याची सुविधा इत्यादीचे नेटवर्क उभे करणे, आदी आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारनं ठोस कृती आराखडा तयार केला पाहिजे, आदी मागण्याही त्यांनी विधानसभेत केल्या आहेत. यावेळी विखे-पाटील यांनी स्वतःच्या मिश्किल भाषेत शेरोशायरीही केली आहे.