"महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’ अजित पवारांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:54 PM2022-08-02T12:54:33+5:302022-08-02T12:54:50+5:30
Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde: पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.
मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ४० आमदारांसह भाजपाचा पाठिंबा घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मुख्यंमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया खोळंबली असून, पुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारचा कारभार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज घणाघाती टीका केली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं पहिलं प्राधान्य हे जनतेचे, पुरग्रस्तांचे प्रश्न सोडवायला असलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारण्याला दुसरं प्राधान्य असलं पाहिजे.राज्यातील शेतकरी पुरामुळे संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात हे संवेदनशून्यतेचं उदाहरण आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
सध्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. कुठले कार्यक्रम घ्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण रात्री १० वाजल्यानंतर मुख्यमंत्री असो वा कुणी व्यक्ती असो माईक बंद करायचा असतो. आम्हीही कधीकाळी उपमुख्यमंत्री होतो. तो नियम सगळ्यांना आहे. तो नियम सुप्रिम कोर्टाने काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. पण हा नियम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुणीही पाळताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील. तर तिथले सीपी, तिथले एसपी करणार काय? एसपींना, सीपींना आदेश देणारेच जर नियम मोडायला लागले, कायदे मोडायला लागले, घटना पायदळी तुडवायला लागले तर ही बाब बरोबर नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला आवर घातला पाहिजे. उत्साही कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे. १० वाजलेत आता आपण नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगितलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. ठिक आहे उत्साह असतो. मात्र दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असं काही झालेलं दिसलं नसल्याचंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांचे दहाच्या नंतर कार्यक्रम सुरू असलेले, किंवा लाऊस स्पीकर सुरू असलेला मी पाहिलं नाही. त्यामुळे मी त्याबाबत काही बोलणार नाही. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालं आहे. सध्या मुख्यमंत्री इतर व्यापात अडकलेले असल्याने ते इतर ठिकाण फिरताहेत, इतर मान्यवरांच्या भेटीगाठी घेताहेत, दर्शन घेताहेत. त्यांनी कुणाचं दर्शन घ्यावं याबाबत मला काही बोलायचं नाही, असेही अजित पवार म्हणाले.