पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठीच एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो.तसेच आपल्या लाडक्या अजितदादांपर्यंत शुभेच्छा पोहचवण्यासाठी तो थेट बारामती देखील गाठतो.मात्र, यंदा राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवरच उपाय म्हणून अजित दादांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी तसे आवाहन केले आहे.
अजित पवारांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. तो बारामतीसह संपूर्ण राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अगदी उत्साहात साजरे करतात. यंदा मात्र, कोरोनामुळे अजित दादांनी त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक महत्वपूर्ण विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझ्यावर, आणि पवार कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, पाठीराखे, हितचिंतक तसेच राज्यातील तमाम जनतेच्या वाढदिवसादिवशी मिळणाऱ्या शुभेच्छा खूप अनमोल आहे. स्वीकारण्यासाठी मी सदैव तत्पर असेल. मात्र, यावर्षी आपल्या सगळ्यांवर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्वांनी फिजिकल डिस्टन्स अनेक सरकारी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.त्याच धर्तीवर यंदा राष्ट्रवादीच्या कुणीही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसाला कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी ही सर्व ताकद आपण कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरुन समाजोपयोगी काम करावे. तसेच आपण फेसबुक, टिव्टर, व्हाटस अॅप यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचा मी आनंदाने स्वीकार करणार आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर न पडता आपली व कुटुंबाची काळजी घेण्याची भावनिक साद देखील घातली आहे