२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि प्रमुख नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत मी कुणालाही चहा पाजणार नाही. ज्यांना मत द्यायचंय, त्यांनी द्यावं, तसेच न द्यायचंय त्यांनी देऊ नये, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
वाशीम येथे तीन राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचं उदघाटन केल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कुठलाही बॅनर किंवा पोस्टर लावायचा नाही, असं मी ठरवलं आहे. तसेच निवडणुकीच्या काळात मी कुणाला चहाही पाजणार नाही. ज्यांना मला मतदान करायचं आहे करावं, ज्यांना मला मतदान करायचं नाही, त्यांनी करू नये. मी कुणाकडून लाच घेणार नाही आणि कुणाला तसं करू देणारही नाही, असं गडकरींनी स्पष्टपणे बजावले.
गडकरी यावेळी म्हणाले की, राजकारणामध्ये खोटं बोलण्याची काहीही आवश्यकता नाही. मी गेल्या ४०-४५ वर्षांमध्ये जे बोललो ते करून दाखवलं आहे. तुम्ही जे काही बोललात ते का झालं नाही, असा सवाल मला कुणी विचारू शकत नाही, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.