मुंबई - श्रीमंतीच्या शिखरावर असूनही तितकेच मातीशी पाय घट्ट रोवलेले उद्योगपती म्हणजे रतन टाटा, रतन टाटांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या साधेपणाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इंन्स्टाग्रामवर रतन टाटांनी केलेल्या पोस्टला हजारोने लाइक्स आणि लाखो लोकांनी पाहिला आहे.
ही एक जाहीरात आहे ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा वर्गात कविता वाचनाचा कार्यक्रमात भाग घेतो, सर्व मित्र आणि पालक त्याच्यासमोर बसलेले असतात त्यांच्यासमोर उभा राहिलेला हा विद्यार्थी आपल्या कवितेची सुरुवात करतो, यात मेरा बाबा देश चलाता है या वाक्यापासून कवितेची सुरुवात होते. उपस्थित पालक, शिक्षक एकमेकांकडे पाहत बसतात.
त्यापुढे जाऊन तो मुलगा सांगतो की, माझे बाबा राजकीय नेते नाही, डॉक्टरही नाहीत, पोलीस नाहीत की आर्मीत नाही पण त्यांनी काम केलं नाही तर देश थांबेल, जर माझे बाबा कामाला गेले नाहीत तर देशातील प्रत्येक घर थांबेल, मुलं शाळेत जाणार नाही, मंत्री मंत्रालयात जाणार नाही कारण माझे बाबा असं काम करतात जे कोणीच करणार नाही.
एका सफाई कामगाराच्या मुलाने वाचलेली ही कविता सर्वांच्या ह्दयाला स्पर्श करते, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नाल्यात, गटारात जीव धोक्यात घालून तो साफसफाई करत असतो, त्याच्या कामामुळे रोग दूर राहतात, किटाणूंपासून संरक्षण मिळतं. देश सुका आणि ओला कचरा वेगळा करत नाही, माझे बाबा त्या कचऱ्यात उतरतात आणि आजारी पडतात, कधी कधी वाटतं माझे बाबा आजाराला हरतील, घरी परतणार नाही, त्यामुळे माझ्या बाबांना वाचवा अशा प्रकारची जाहीरात रतन टाटांनी शेअर केली आहे. टाटा ट्रस्टअंतर्गत 'मिशन गरीमा' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सफाई कामगारांच्या कामात कमी होण्यासाठी नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखावी असं सांगण्यात आलं आहे.
याबाबत रतन टाटांनी सांगितले की, मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. अनेक धोकादायक स्थितीत त्यांचे काम सुरु असतं. मिशन गरीमा अशा लोकांसाठी सुरक्षा, आरोग्यदायी आणि मानवी काम करण्याची परिस्थिती बदलेल, जेणेकरून त्यांना स्वच्छ वाटेल असं त्यांनी म्हटलं. तसेच सफाई कामगारांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी लोकांनीही कचऱ्याचं वर्गीकरण करायला हवं असं आवाहन केलं आहे.