नागपूर - ललित पाटील प्रकरणी ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त केले आहे. त्याचसोबत आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करायलाही मागे पुढे पाहिले जाणार नाही. ही न्यायिक प्रक्रिया आहे. कुणाचेही या प्रकरणात धागेदोरे सापडले तर यात निश्चितच कारवाई होणार आहे.हे आंतरराष्ट्रीय स्तरावर षडयंत्र चालले आहे. मागील काळात आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले ड्रग्ज सापडले त्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे. पण आपल्याकडे आपल्या देशातील लोक वेगवेगळ्या फॅक्टरीत हे ड्रग्स तयार करतायेत हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार या प्रकरणी रोज कुठे ना कुठे छापे टाकून कारवाई करतेय.या प्रकरणी कोणालाही सरकार पाठिशी घालणार नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. ड्रग्स हा एकप्रकारे हल्ला आहे त्याला उत्तर दिले पाहिजे. या प्रकरणी ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. अधिष्ठातांविरोधात योग्य पुरावे असतील तर त्यांना बडतर्फ केले जाईल. यात सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. गेल्या २ महिन्यात ड्रग्स प्रकरणी प्रचंड मोठ्या कारवाया झाल्या आहेत. जर आपण यावर कारवाई केली नाही तर आपली पुढील पिढी बर्बाद होऊ शकते. डार्कनेटच्या माध्यमातून याचा व्यवहार सुरू आहे. कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जातेय. त्यावरही पोलिसांचे लक्ष आहे असं त्यांनी सांगितले.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत चर्चा झाली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. एका कैद्याला ७ महिने ससूनमध्ये ठेवले जाते. तिथेच गेटवर ड्रग्स सापडले जातात. त्यानंतर तो आरोपी ससूनमधून फरार होतो. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्याचा शोध आहे. हे प्रकरण सरकारसाठी आव्हात्मक आहे. दक्षिण भारतातून ललित पाटीलला अटक केली. हा आरोपी पळाला नाही तर त्याला पळवले असं तो मीडियाला सांगतो. त्यामागे कोण शक्ती आहे याचा शोध घेतला पाहिजे. या प्रकरणात काहींना अटक केली. पण ललित पाटील याच्यावर ज्यांनी उपचार केले ते संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप कारवाई नाही. या प्रकरणी नार्को टेस्ट करावी. हे प्रकरण आपण सीबीआयला देणार का असा प्रश्न अहिर यांनी उपस्थित केला.