नवी दिल्ली - भारतीय रेल्वे विभागाकडून देशातील काही राज्यातून प्रवासी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सोडण्यात आलेल्या गाड्या केवळ राज्य सरकारच्या विनंतीवरुन सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून परराज्यात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. राज्य सरकारच्या सांगण्यावरुन लॉकडाऊन काळात शेल्टर होममध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविसाठी श्रमिक ट्रेन सुरु केली होती. मात्र, इतर कुठलीही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार व नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. तसेच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. त्यामुळे, रेल्वे सोडण्यात येत आहेत की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. केवळ राज्य सरकारच्या सूचनेनुसारच प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात येईल, असेही रेल्वे विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कुणीही रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये, इतर कुणालाही रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. तसेच, रेल्वेकडून तिकीटांची विक्रीही बंद ठेवण्यात आली आहे.
देशभर लाखो प्रवाशांची यातायात करणा-या लांबपल्याच्या गाड्यांचे रेक्स हे ठिकठिकाणी उभे असून त्यांच्यावर काही ठिकाणी सीसी टीव्ही तर जेथे ती सुविधा नाही तेथे रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्या गाड्यांची इंजिन देखिल विविध ठिकाणी उभी असून त्यांची देखभाल मात्र सर्वत्र केली जात आहे. अनेक इंजिन ही सध्या सुरु असलेल्या मालगाड्यांची वाहतूकीसाठी टप्प्यांवर चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये कल्याण, मुलुंड, इगपुरी, लोणावळा या भागात देखिल इंजिन सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्याच पद्धतीने पुणे, नागपूर, सोलापूर या मंडळांमध्येही ती सेवा कार्यरत आहे.
दरम्यान, जेथे लांबपल्याच्या गाड्यांचे डबे उभे आहेत त्या डब्यांमधील पंखे, स्वच्छतागृहांमधील नळ, वॉशबेसिन, डब्यांमधील पंखे, दिवे तसेच वातानुकूलीत डब्यांमधील अन्य सुविधा, आरसे आदींची चोरी होऊ नये यासाठी आरपीएफचे जवान सतर्क ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय संपत्तीवर दगडफेक होऊ नये, त्याचे नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान जेथे आवश्यकता आहे तेथे वेळोवेळी डबे स्वच्छ करणे, निर्जंतुक करणे ही कामे देखिल करण्यात येत आहेत.