मुंबई, दि. 16 - बैलगाडा शर्यतीवर पुन्हा एकदा बंदीचं संकट आहे. कारण बैलगाडी शर्यतींना मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसंच राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. बैलगाडी शर्यतींबाबत राज्य सरकारची नियमावली अस्तित्त्वात नसताना परवानगी शक्य नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. यासंदर्भात 2 आठवड्यांत राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर पुन्हा एकदा बंदीचं संकट घोंगावत आहे.
बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली होती. त्यामुळे काही नियम आणि अटींवर बैलगाडा शर्यती पूर्ववत होतील अशी अपेक्षा वर्तवली जात होती.
राज्यात बैलगाडी शर्यतीची 200 वर्ष जुनी परंपरा आहे. शर्यतींदरम्यान बैलांवर अत्याचार होतात, त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै 2011मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली.हा वाद पुढे कोर्टात गेला. हायकोर्टानेही प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल देत शर्यतींवर बंदी घातली. मग दोन वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतीवरील हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली होती.दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावडेकरांकडे केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारला धक्का दिला.बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती - - बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात. - खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते. -विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.
आणखी वाचा- (आधुनिक युगात बैलगाडी होणार नामशेष)