केंद्र सरकारने वाढवून का होईना दोनदा कर कपात केल्यानंतर राज्य सरकारने उसणे अवसान आणून पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये दीड-दोन रुपयांनी कपात केली. रविवारी सायंकाळी ही घोषणा करण्यात आली. परंतू, आज मंगळवार उजाडला तरी काही पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झालेली नाही. यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळालेला नाही.
तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पुन्हा एप्रिलमध्ये दर वाढले होते. मात्र, इतर राज्यांनी धडाधड कर कमी केले तरी आपल्या राज्य सरकारने आडमुठेपणा दाखवत दर कपात केली नव्हती. अखेर केंद्राच्या दुसऱ्या दरकपातीनंतर राज्य सरकारने किंचित का होईना व्हॅट कमी केला.
पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर दि. २१ मे २०२२ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महापालिका हद्दीत पेट्रोलवर प्रतिलिटर ३२ रुपये ९० पैशांऐवजी ३० रुपये ८२ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर २२ रुपये ७० पैशांऐवजी २१ रुपये २६ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी दि. २१ मे २०२२ पासून पेट्रोल वर प्रतिलिटर सरासरी ३२ रु. ८० पैशांऐवजी ३० रु. ८० पैसे इतका तर डिझेल वर प्रतिलिटर २० रु. ८९ पैशांऐवजी १९ रु. ६३ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. सर्व ऑइल कंपन्या,पेट्रोल पंपधारकांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कर आकारणी करावी, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले होते.
मात्र, आजही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केलेली नाही. यामुळे ठाकरे सरकारचा आदेश कंपन्या पाळत नसल्याचे दिसत आहे. आता हे दर कमी होणार की नाही? यापेक्षा सरकार आणि कंपन्यांमध्ये काही बिनसले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने व तात्काळ प्रभावाने कपात करण्यास सांगितले आहे. तरी देखील कंपन्या इंधनाचे दर कमी करण्याचे नाव घेत नाहीएत. यामुळे हे दर कंपन्या आता येत्या १ जूनपासून कमी करतील अशी शक्यता आहे.