नांदेड/परभणी/पालम : शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात कसल्याही प्रकारची प्रिंटिंग मिस्टेक नाही, असे उत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
परभणी, पालम आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, अत्यंत जबाबदारीने पूर्ण पडताळून काना, उकार, मात्रा सर्व बाबींची तपासणी करून हा वचननामा प्रसिद्ध केला आहे़ त्यातील प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत़ विरोधक निवडणुका आल्या म्हणून आश्वासने दिली असल्याचे म्हणत आहेत; परंतु, आम्ही बोलत नाही तर करून दाखवितो. लोहा येथील प्रचार सभेपूर्वी माळेगाव येथील खंडेरायाचे ठाकरे यांनी दर्शन घेतले़ महायुतीला सत्ता द्या, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ, असे आश्वासन देत मी दिलेल्या वचननाम्यातील प्रत्येक शब्द पाळणार असल्याचे ते म्हणाले़
यावेळी माजी आ़ रोहिदास चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश केला़राज्यातील सरकार अस्थिर होऊ नये, यासाठी शिवसेनेने पाठिंबा देऊन चांगल्या कामात युतीच्या सरकारला साथ दिली आहे; परंतु, या सरकारकडून दिलेली कर्जमाफी आम्हाला पटलेली नसून, नव्याने सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. शरद पवार यांच्याविषयी आपणाला आदर आहे़ ते फिरत आहेत; परंतु, ते किती बोलतात, अन् काय बोलतात, आता हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते सांगतात़ मग, २०१४ साल आठवा़ निकालाचा दिवस आठवा़ त्यादिवशी संपूर्ण निकाल लागण्याअगोदरच भाजपला बिनशर्त पाठिंबा कोणी जाहीर केला होता?
काहींना सगळी पदं घरातच लागतातखा़ प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली़ काही जणांना सगळी पदे आपल्याच घरात असावी असे वाटते़ आमदारकी, खासदारकी दिली तरी त्यांना अजून पदे हवीत़ अशा गद्दारांना धडा शिकवून सेनेचा भगवा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले.