अविनाश साबापुरेयवतमाळ : यशस्वी राऊत या चिमुकलीचा शाळेच्या शौचालयात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला अन् महाराष्ट्राचे मन कासावीस झाले. राज्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या प्राथमिक शाळांच्या कारभाराचे वाभाडे या निमित्ताने निघाले. या शाळांमध्ये वीज नाही, पाण्याची सोय नाही, सुरक्षा भिंत नाही, शौचालय नाही अन् या सुविधा असल्याच तर त्या वापरायोग्य नाहीत. मुलींच्या व्यक्तिगत अडचणी जाणून घेण्यासाठी बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत.
आरोग्य तपासणीही टाळलीदरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांपैकी केवळ ४६ हजार ७२२ शाळांनीच ही जबाबदारी पार पाडली, तर १८ हजार ९१७ शाळांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी झटकली आहे.
अहवालात सुंदर चित्र, प्रत्यक्षात काय?विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील शिक्षण क्षेत्राचे सुंदर चित्र मांडले आहे. प्रत्यक्षात शाळांनी यू-डायस प्रणालीवर आपल्या शाळांमधील सुविधांची भरलेली माहिती वेगळेच काही सांगत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या १५ हजार १७१ शाळांमध्ये वीजपुरवठाच नाही. १० हजार ६७ शाळांमध्ये वीज मीटर आहे; पण पुरवठा नाही. त्यामुळे विजेच्या उपकरणांबाबत गांभीर्य नाही. अशाच बेफिकिरीतून भंडारा जिल्ह्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालयात पडलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.