ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - केवळ काँग्रेसचा विचार आणि काम बघूनच तिकिटांचे वाटप होईल, नातीगोती बघून नाही असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे व सुशीलकुमार शिंदे यांचे कान टोचले असल्याची चर्चा आहे. नाराजीमुळे बंडाचा पवित्रा घेतलेल्या राणेंना थंड व्हावे लागले आणि काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे जाहीर करावे लागले होते. परंतु हे करताना आपल्या मुलाला कणकवलीमधून निवडणूक लढवण्यास मिळावी अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्याप्रमाणेच सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांच्या मुलीसाठी विधानसभा तिकिटाची अपेक्षा व्यक्त केली होती. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र थेट नाव न घेता राणे व शिंदे यांना टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटप नातीगोती बघून होणार नाही. काँग्रेसचा विचार असलेल्या, चांगलं काम असलेल्या व निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच तिकिट देण्यात येईल असे चव्हाण म्हणाले. हा राणे व शिंदे यांना धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.