मुंबई - अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपेलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी मतदारसंघातील राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरु केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघात सुद्धा इच्छुकांनी पुढील रणनीती आखणे सरू केली आहे. मात्र १९९० पासून येथील मतदारांनी आजपर्यंत, सलग दोन पंचवार्षिकमध्ये कुणाही एकालाच आमदारकीचा कौल दिला नाही. त्यामुळे भाजपचे विद्यामान आमदार राजेंद्र नजरधने यांना यावेळी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या कारणांनी काही मतदारसंघ चर्चेत आले असल्याचे अनेकदा पहायला मिळाले. अशीच काही वेगळी चर्चा आहे ती, उमरखेड विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात १९६२ पासून आजपर्यंत, माजी आमदार शंकरराव माने सोडले तर त्यांनतर कुणालच येथील मतदारांनी सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून दिले नाहीत. त्यामुळे यावेळी सुद्धा हा इतिहास कायम रहाणार का याची मोठ्याप्रमाणात चर्चा पहायला मिळत आहे. तर विद्यमान आमदार नजरधने यांना यावेळी चांगलाच जोर लावावा लागणार आहे.
उमरखेड मतदारसंघात १९६२ पासून १९९० पर्यंत सलग काँग्रेसचाच उमदेवार येथून निवडून येत असे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उमरखेडमध्ये पहिल्यांदाच १९९० मध्ये जनता दल मधून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी विजय मिळवला. मात्र माने सोडले तर, एकच उमेदवार कधीच दोनदा निवडून आला नाही हे विशेष. ह्या वेळी आता पुन्हा हा इतिहास कायम राहिल्यास आपला विजया होणार, अशी अपेक्षा विरोधकांना लागली आहे. तर हा इतिहास बदलून पुन्हा आमदार होण्याचे मोठे आव्हान आमदार नजरधने यांच्या समोर आहे.
लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांना उमरखेडमधून मिळालेले मताधिक्य विजयाचे कारण ठरले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत याच उमरखेडमधून शिवसेनचे उमेदवार हेमंत पाटील यांना सर्वाधिक मतांची लीड मिळाली आहे. त्यामुळे उमरखेड विधानसभा मतदारसंघात युतीची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली असल्याचे पहायला मिळत असून, जर अशीच परिस्थिती राहिली तर यावेळी आमदार नजरधने हे 'नो रिपीटर'चा इतिहास बदलतील असे बोलले जात आहे .