सोलापूर : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींमध्ये ३४६ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असून त्या कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, करमाळा, कुर्डूवाडी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नऊ नगरपालिकातील काही बांधकाम विभागाने पावसाळ््यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे तर काहींनी प्रक्रिया सुरु केली आहे. या धोकादायक इमारतींच्या पाडकामाबद्दल मात्र उदासीनता दिसून येत आहे. काही ठिकाणी नोटिसी बजावण्यात आल्या आहेत मात्र स्वत:हून कोणीही इमारतीचे पाकड काम केलेले नाही. नोटिसी बजावणे, वर्तमापत्रांमध्ये प्रसिद्धीकरण करणे याशिवाय फारशी तसदी घेतली नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. स्ट्रक्चरल आॅडिटचा तर पत्ता नसल्याचे चित्र समोर आले आहे.
मंगळवेढ्यात १०५ घरे व इमारती धोकादायकमंगळवेढा पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक घरांचा १० जून रोजी सर्व्हे केला आहे़ त्यामध्ये मोडकळीस आलेल्या १०५ घरे व इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत़ गतवर्षी ६८ जणांना नोटिसा बजावून स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत; मात्र आजही ते पर्यायी व्यवस्था नसल्याने याच धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत.
१३६ बांधकामांना परवानगीपंढरपुरात वर्षभरात १३६ बांधकामाला परवानगी मिळाली़ बांधकाम परवाना मागणीसाठी आलेले नागरीकच इतर इंजिनिअरकडून इमारतींचे भूकंपरोधक दाखला घेऊन येतात. शहरात २३ ठिकाणच्या इमारतीसाठी जागा मालक आणि भाडेकरूंचा वाद सुरू आहे. धोकादायक इमारतींमुळे शहरात दुर्घटना झाली नाही.
प्रशासनाकडून ठोस उपाययोजना नाहीजिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि तीन नगर पंचायतीमध्ये असलेल्या जुन्या इमारतींच्या बाबतीत स्ट्रक्चरल आॅडिटच झाले नसल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सर्व्हेक्षण झाले असले तरी याबद्दल ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. या धोकादायक इमारतींच्या बाबतीत गांभीर्याने दखल न घेतल्यास दुर्घटना घडू शकते.