मुंबई : ‘अडीच वर्षांसाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असा शब्द भाजपने कधीही दिलेला नव्हता. राज्यात पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वात महायुतीचे सरकार येईल’, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पदाबाबतचा शिवसेनेचा दावा फेटाळला.
ते दिवाळीनिमित्त वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होते. शिवसेनेसोबत औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. १९९५ चा फॉर्म्युलादेखील चर्चेत नाही. आमचे जे ठरले आहे त्यानुसारच चर्चा करू आणि योग्य तो निर्णय करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरवताना त्यातही भाजपने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे मान्य केले होते, असा शिवसेनेचा दावा आहे. या बाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, तसे काहीही ठरलेले नव्हते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनीही तसा कुठलाही शब्द त्यावेळी दिलेला नव्हता. शिवसेनेच्या मागण्यांवर मेरिटनुसारच निर्णय होईल. आम्ही वा शिवसेनाही कोणताही दुसरा पर्याय शोधत नसून पाच वर्ष आम्ही स्थिर सरकार देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निकालात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आले. आम्ही मेरिटमध्ये येणार होतो, पण फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. १९९० नंतर भाजपइतका स्ट्राईक रेट कोणत्याही पक्षाला दाखवता आलेला नाही. गेल्या ३० वर्षांत आमच्या इतका स्ट्राईक रेट कोणीच केलेला नाही. अगदी २०१४ च्या निवडणुकीत आमचाही स्ट्राईक रेट इतका नव्हता, असेही ते म्हणाले.
पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी - सुधीर मुनगंटीवारविधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र येऊन लढली होती. मतदारांचा जनादेश नवीन पर्याय शोधण्यासाठी नाही. शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत, तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर नेम साधला.भाजप-शिवसेना युतीमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच ठरलेला नव्हता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने सत्ता वाटपाबाबतची बैठकच रद्द केली. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
‘आज दुपारी चर्चेसाठी बैठक ठरलेली होती. भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन नेते यांच्यात चर्चा होणार होती पण ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या फॉर्म्युल्याबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता असे मुख्यमंत्री जर बोलले असतील तर चर्चेचे प्रयोजन काय? कोणत्या मुद्यावर चर्चा करायची? म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ही बैठक आम्ही रद्द केली, असे राऊत म्हणाले. प्रश्न नाराज होण्याचा नाही तर फिप्टी-फिप्टीच्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्याचा आहे. असं नेमकं काय ठरलं की ज्यामुळे लोकसभेची युती झाली, विधान सभेला युती झाली.... आणि आता ते म्हणतात काही ठरलंच नव्हतं! मग ठरलं तरी काय होतं, असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्रिपद हा ठरल्याप्रमाणे आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, असे ते म्हणाले.
आमच्या मुखपत्राचा स्वभाव बदलणार नाही. आम्ही भाजपला कधीही दुखावलेले नाही. शरद पवारांचं कौतुक सर्वात आधी नरेंद्र मोदींनी केलं होतं. आम्ही मोदींचे समर्थक आहोत. पवारांना पद्मविभूषण कोणी दिलं, असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या टीकेसंदर्भात राऊत यांनी केला. भाजप शिवसेनेची कोणतीही बैठक मंगळवारी ठरलेली नव्हती, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.