ऑनलाइन लोकमतउदगीर/जळकोट, दि. 9 - भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल, अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळून गुरुवारी उदगीरमध्ये केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यांतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी उदगीर व जळकोट येथे सभा घेतल्या. यात त्यांनी त्यांचे बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, माझ्यावर कितीही टीका केली तरी बोलले नाही. परंतु आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका, उत्तर द्या़, अशी शपथ घातलीय. म्हणून मी बोलतेय, आमचे बंधू म्हणतात, गोपीनाथ मुंडेंनी त्यांना बाहेर काढले. आम्हाला जायचे नव्हते. त्याच्या दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात, धनंजयने दीड वर्ष आमच्याकडे चकरा मारल्या. शेवटी दुसऱ्या पक्षात जातो म्हटल्यावर आम्ही घेतले. मग आता खोटं कोण बोलतंय, हे त्यांनी जाहीर करावेच. गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंहासनावरून उतरवण्याचे काम केले आहे. आता परत तेथे बसू न देण्याचे काम आम्ही करू, इंग्रजांची जुलमी राजवट गेली अन् त्यांच्याहून जुलमी काँग्रेसची राजवट देशात आली. यांनी नागरिकांना गरिबीतच ठेवले. आता ही राजवटही दूर करा अन् भाजपाला व पर्यायाने विकासाला साथ द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, व्यंकट तेलंग, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, माजी आमदार मनोहर पटवारी, रमेश कराड यांच्यासह पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.वाढदिवसाचे नवे संशोधनगोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसावरून चाललेल्या वादावर बोलताना पंकजा मुंडेंनी अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले. त्या म्हणाल्या, आता तर नवीन संशोधनच यांनी सुरू केले आहे. गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस कुठला? ते आता हयात नाहीत. मृत शत्रूबद्दलही आपण वाईट बोलत नाही़ ते जिवंत नसताना हिणवण्याचे काम करू नका, असंही त्यांनी ठणकावलं आहे.
खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल- पंकजा मुंडे
By admin | Published: February 09, 2017 4:34 PM