मुंबई : 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला.
चित्रपट प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले, त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. वडोदरा रेल्वे स्थानकातही चाहत्यांची झुंबड उडाली होती, त्यामध्ये समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते.
गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आणि त्यांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमारही केला, त्यामुळे एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. या गर्दीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले. गर्दीतून वाट काढणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य ४ जण जखमी झाले आहेत.
चाहत्यांची निराशा
शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती. ही गाडी सुटते त्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सजावटही केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला प्रत्यक्षात बघता येईल आणि त्याच्यासोबत एक फोटो काढता येईल यासाठी स्थानकाबाहेरुन आणि स्थानकात चाहत्यांनी जिथे मिळेल तेथे जागा पकडली होती. बराच वेळ सुरु असलेल्या गोंधळात शाहरुख खान संध्याकाळी ५.४७ च्या सुमारास प्लॅटफॉर्मवर आला. मात्र कुणालाही कळायचा आत पोलीस आणि अंगरक्षकांच्या गराड्यात त्याने आपल्या आरक्षित डब्यात प्रवेश केला आणि त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.
Huge crowd at Vadodara Railway station to see Shahrukh Khan. One of the two injured persons succumbs to injuries in the commotion #Raeespic.twitter.com/3yZz4LZt7H— ANI (@ANI_news) 24 January 2017
शाहरुखमुळे राजधानीचा खोळंबा?
दरम्यान वक्तशीरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा 'रईस'च्या प्रमोशनमुळे चांगलाच खोळंबा झाला. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी शाहरूख आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने जाणार होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. पण शाहरुखला स्थानकात पोहोचण्यासच उशीर झाल्यामुळे नेहमीच्या ५ वाजून ४० मिनिटांच्या वेळेऐवजी ही गाडी ५ वाजून ४८ मिनिटांनी सुटली. शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती.