मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. क्षीरसागर यांच्या प्रवेशाचा विरोधीपक्षनेने धनंजय मुंडेनी चांगलाच समाचार घेतला. बीडच्या लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या निकालातील महाआघाडीची लीड पाहून क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडला असा टोला मुंडेनी लगावला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, क्षीरसागर यांनी अगोदरच पक्षप्रवेश करायला पाहिजे होता.लोकसभा निवडणुकीतच त्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे आता हा प्रवेश औपचारिकता आहे. अशी टीका धनंजय मुंडेनी यावेळी केली.
गुरुवारी देशातील सर्वच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येणार आहे. बीड जिल्हात उद्या सर्वात जास्त लीड बीड विधानसभा मतदार संघातून महाआघाडीच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा निकाल जर शिवसेना-भाजपने पहिला असता तर क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता. यामुळेच क्षीरसागर यांनी आजचा मुहूर्त निवडला, असा खोचक टोला मुंडेनी यावेळी क्षीरसागर यांना लगावला.
राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय झाला. स्वाभिमानाला ठेच पोहोचली. पक्षातील नाराजीबद्दल शरद पवारांशी चर्चा झाली. तरी सुद्धा पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्ष सोडावा लागतोय, असे जयदत्त क्षीरसागर यांनी दावा केला आहे. क्षीरसागर यांच्याआधी माजी मंत्री सुरेश धस यांनी सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.