योगेश पांडे / ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - निवडणूक म्हटली की सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोर येतो व प्रचारसाहित्यावर तर उमेदवारांच्या अक्षरश: उड्या पडतात. मात्र मतदानाला महिना उरला असताना अद्यापही निवडणूकींची वातावरण निर्मिती हवी तशी झालेली नाही. उमेदवारीबाबतची अनिश्चितता असल्याने इच्छुकांनी प्रचार साहित्याचे ‘बुकिंग’देखील सुरू केले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोटाबंदीमुळे पक्ष व उमेदवार सावधपणे पावले उचलत आहेत. त्यामुळे यंदा प्रचाराला फटका बसणार असल्याची भिती विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूकांचा प्रचार ‘सोशल मिडीया’वरुन होत असला तरी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून पक्षाचे बिल्ले, स्टीकर्स, झेंडे इत्यादी प्रचार साहित्याचीच मदत घेण्यात येते. पक्षाच्या उमेदवाराचा चेहरा मतदारांपर्यंत पोहोचावा यासाठी या प्रचार साहित्याची निवडणूक काळात प्रचंड मागणी असते. कार्यकत्यांची प्रचार साहित्याच्या दुकानांमध्ये अगोदरपासूनच गर्दी दिसून येते.
जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून आता उमेदवारांच्या नावाची घोषणा कधी होते याची प्रतिक्षा आहे. इच्छुक उमेदवारांमध्येदेखील अनिश्चिततेचे वातावरण आहे. पक्षाचे तिकीट मिळणार की नाही, याची अनेक प्रस्थापितांनादेखील शंका आहे. असा स्थितीत पक्षांकडून जनसंपर्काला सुरुवात झाली असली तरी प्रचारात पारंपारिक साहित्य दिसून आलेले नाही.नागपूर शहरात प्रचार साहित्य विक्रीची दुकाने ओस पडली आहे. प्रचार साहित्य अनेक दिवसांपासून येऊन पडलेले आहे. परंतु अद्यापही राजकीय पक्ष व उमेदवार फारसे फिरकलेले नाहीत. साधारणत: उमेदवारांपेक्षा पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य घेण्यात येते व त्यानंतर ते उमेदवारांमध्ये वाटण्यात येते. महिनाभर अगोदरपासूनच याची ‘बुकिंग’देखील करण्यात येते. परंतु यंदा मात्र पक्षांनीदेखील या दुकानांकडे पाठ फिरविलेली आहे.
यादी जाहीर झाल्यावरच येईल उत्साह
दरवेळेच्या निवडणूकांपेक्षा यंदा फारच वेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे. अगोदर सामान्य नागरिक व कार्यकर्ते हिरीरीने प्रचारात सहभागी होत. आता हे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रचार साहित्याची मागणीदेखील घटली आहे. शिवाय नोटाबंदीमुळे उमेदवार जपूनच प्रचार करण्याच्या मानसिकतेत आहेत. याचा फटका मात्र प्रचार साहित्य विक्रीला नक्कीच पडतो आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, असे मत प्रचार साहित्य विक्री करणारे निलेश गांधी यांनी व्यक्त केले. उमेदवारांना तिकीट मिळणार की नाही ही चिंता सतावते आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्याची ते प्रतिक्षा करत आहेत, अशी माहिती निलेश नाशिककर यांनी दिली.
केंद्रपातळीवरुनच प्रचार साहित्य ?
दरम्यान, मोठ्या पक्षांकडून प्रचार साहित्यासंदर्भात पदाधिकाºयांना जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. काही पक्षांना केंद्रपातळीवरुनच बरेचसे प्रचार साहित्य पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.