ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देण्यावरुन राजकारण तापत असताना 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी या वादात उडी घेत बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवला आहे. बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे भालचंद्र नेमाडे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधत माझ्या दृष्टीने नेमाडे साहित्याक्षेत्रातले दहशतवादी होत आहेत, अशी टीका केली.
बाबासाहेबांना पुरस्कार हा मराठी मातीचा सन्मान आहे असे सांगत त्यांना सन्मान मिळू न देणं हा दुर्गप्रेमींचा अपमान आहे असे पाटील म्हणाले. बाबासाहेब कधीच स्वतःचा टेंभा मिरवत नाहीत, ते स्वतःला इतिहासकार नव्हे, शिवशाहीर संबोधतात असे सांगत बाबासाहेबांना जातिभेदामुळे, द्वेषातून विरोध होत असून ती खेदाची बाब असल्याचेही पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी भालचंद्र नेमाडेंवरही टीका केली. नेमाडेंनी छत्रपतींबद्दल बोलावं हा विनोद असल्याचे सांगत त्यांनी आधी इतिहास वाचावा असा सल्ला पाटील यांनी दिला. नेमाडेंच बोलणं वरवरचं असतं, त्यांची उक्ती एक तर कृती दुसरीच असते. आयुष्यभर त्यांनी पारितोषिकांना नाकं मुरडली आणि आता ते पारितोषिक स्वीकारत असतात, अशा शब्दांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले.