जान्हवी मोर्ये। लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : इंग्रजी माध्यमाच्या व आयसीएसई, सीबीएसई , आयजीसीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळेतून गणवेश, पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे. या बड्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्यांच्या भवितव्यापोटी पालक शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात ‘ब’ काढत नाही. मात्र यंदा नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने या शाळांकडून सुरु असलेल्या लुटमारीच्या विरोधात आंदोलन करण्याचा मानस काही काही पालकांनी व्यक्त केला आहे.पालक संजय गायकवाड यांचा मुलगा ओंकार शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकतो. आयसीएसईच्या अभ्यासक्रमाचे तो शिक्षण घेत आहे. गायकवाड यांनी सांगितले की, मुलाच्या पाठ्यपुस्तकांसाठी पाच हजार रुपये त्यांना भरावे लागले. शाळेच्या युनिफॉर्म ४ हजार ५०० रुपये किंमतीचा आहे. शालेय साहित्य व गणवेशाचे शाळेचे दर खूप जास्त आहेत. सर्वसाधारण पालकांच्या खिशाला ते परवडणारे नाहीत. पालकांची शाळांकडून होणारी लूट या विरोधात सर्व पालकांना घेऊन आंदोलन करण्याचा मानस गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. गायकवाड यांचा एक मुलगा इयत्ता सातवीत पाटकर शाळेत शिक्षण घेत आहे तर दुसरा दुसरीच्या वर्गात ओंकार शाळेत आहे. पाटकर शाळेतून गणवेश खरेदीच्या सक्तीला पालकांनी विरोध केल्याने आता बाहेरुन गणवेश खरेदी करण्याची मुभा दिली गेली आहे. पाटकर शाळेचे गणवेशाचे दरही जास्त होते. आयसीएसई अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतून न घेतल्यास बाजारात मिळत नाही. कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली परिसरात ही पुस्तके उपलब्ध होत नाही. त्यासाठी पालकांना पुन्हा ठाण्याला धाव घ्यावी लागते. ही पुस्तके वर्कबूक स्वरुपात असतात. त्यामुळे सेकंडहॅण्ड पुस्तके वापरता येत नाही. दुसऱ्या वर्षी त्याचा पाल्याला काही एक उपयोग होत नाही. शालेय पुस्तकांच्या किंमती दोन हजार रुपयांपर्यंत परवडू शकतील. मात्र त्याची किंमत साडेचार हजार रुपये आकारली जाते. ती कितीतरी जास्त आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी नाईलाजास्तव पुस्तके शाळेतून खरेदी करावी लागतात. ही आमच्यासारख्या पालकांची अडचण आहे. सिस्टर निवेदिता शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की, दोन शर्ट, हाफ पॅण्ट या सगळ््या गणवेशासाठी दोन हजार ५०० रुपये मोजावे लागले. हा दर जास्त आहे. शालेय गणवेश बाहेरुन शिवून घेतला तर स्वस्त पडू शकतो. शाळेतून गणवेश खरेदी करण्याची सक्ती शाळांनी पालकांवर करु नये. शाळा वाट्टेल ते दर आकारून पालकांना अक्षरश: लुटतात. शाळेतून सर्वच विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करावे, असे शाळांना वाटत असेल तर त्याचे दर माफक असावेत, अशी सर्वच पालकांची मागणी आहे. कल्याण शीळ रोडवरील ‘इरा ग्लोबल’ या शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांकरिता दुकानात मिळणाऱ्या सहा नंबरच्या युनिफॉर्मचा दर शर्टाची किंमत ४३० रुपये, ब्लेजरचा दर १ हजार ५५० रुपये, पॅण्ट ५५० रुपये, सॉक्स ७० रुपये, टाय ५० रुपये आहे. तर शाळेतील याच साईजसाठी शर्टाची किंमत ४६५ रूपये, पॅण्ट ६७५ रूपये, ब्लेजर ११६० रूपये, टाय ६०, सॉक्स ५० रूपये, पीटी गणवेशासाठी टीशर्टसाठी ६९० रूपये आहे. शाळा व दुकानातील दरांमध्ये ही तफावत कशाकरिता व ही नफेखोरी कशाकरिता याचे उत्तर शाळा देत नाही. कल्याणचे परवीन खान यांचा पाल्य केसी गांधी शाळेत शिकतो. त्यांनी सांगितले की, शाळेतून दर जास्त घेतले जातात. दर्जा चांगला मिळत असला तरी दर जास्त घेतले जातात. शाळेतून साहित्य न घेतल्यास पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे बाहेर साहित्य मिळाले नाही. तर पाल्याचे काय होणार असा संभ्रम तयार केला जातो. शाळेचा लोगो गणवेशावर उपलब्ध होत नाही. चौथीला स्काऊट, गणवेश, पीटी ड्रेस आहे. साधे क्लर्स ही बाहेरुन घेऊन दिली जात नाही.शालेय साहित्य विक्री करणारे डोंबिवलीतील विक्रेते मनिषा देढीया यांनी सांगितले की, शाळेने साहित्य विक्री केलेली असला तरी त्याचा फारसा परिणाम आमच्या व्यवसायावर झालेला नाही. शालेय साहित्याचा थोडाफार स्टॉक आम्ही ठेवतो. पुस्तक विक्रेते मयुरेश गद्रे यांनी सांगितले की, एसएससी बोर्डाची पुस्तके आम्ही ठेवतो. इतर अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतून दिली जात असल्याने आम्ही ती पुस्तके ठेवत नाही. इतर बोर्डाच्या पुस्तकांमध्ये अनेक प्रकाशक असल्याने शाळा ज्या प्रकाशकांची पुस्तके निवडेल. ती पुस्तके अभ्यासक्रमात येतात. त्यामुळे एसएससी बोर्डासाठी एखादं पुस्तक सर्वठिकाणी सारखचे असते. तसं या बोर्डाबाबत होत नाही. तृप्ती बुक सेंटर मालकाने सांगितले की, आयसीएसई व सीबीएसई अभ्यासक्रमाची पुस्तके आम्ही ठेवत नाही. एसएससी बोर्डाची पुस्तके आम्ही विक्रीसाठी ठेवली आहेत.
नामांकित शाळांची राजरोस दरोडखोरी
By admin | Published: June 07, 2017 4:01 AM