लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पदव्युत्तर शिक्षणानंतर पोलिसात भरती होण्यासाठी त्याने एमपीएससीची परीक्षा दिली. मात्र, तो परीक्षेत नापास झाला. खाकीच्या हौसेपोटी त्याने बाजारातून पोलिसांचा गणवेश विकत घेतला. त्यानंतर, पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, २ ते ५ लाखांमध्ये त्याने सरकारी खात्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक सुरू केली. या भूमिकेत तो स्वत:चीच बढती करत गेला. पोलीस उपनिरीक्षक, स्टेशन इंचार्ज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, त्याने ६0 हून अधिक तरुणांची फसवणूक केली. ललित ओमप्रकाश सावंत (५४) असे प्रतापी तोतया पोलिसाचे नाव आहे. ललितला यापूर्वीही अटक झाली होती. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचा ठगीचा धंदा सुरूच होता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने त्याला सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. विरार पश्चिमेत राहणार्या सावंतचे बोरीवलीत झेरॉक्सचे दुकान आहे. २00७ मध्ये त्याला वसई, तर २0१५ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यामध्ये तो उपनिरीक्षक, स्टेशन इंचार्ज आणि नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून फसवणूक करत असे. नोकरीच्या शोधात असलेल्या बोरीवलीतील एक तरुण सावंतच्या जाळ्यात अडकला. सहायक पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदावर नोकरी लावण्याचे आमिष त्याला दिले. त्याला कॉल लेटर, अपॉइंटमेंट लेटर, मेडिकल करून घेणे बाबतची बनावट कागदपत्रे देऊन त्याचा विश्वास संपादन केला. त्याच्याकडून ५ लाख ७५ हजार उकळले. मात्र, पैसे देऊनही नोकरीवर रुजू होण्याबाबत सावंत टाळाटाळ करत असल्याने, तरुणाने ५ फेब्रुवारी बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कागदपत्रे ताब्यातसावंतच्या कारच्या झडतीत पोलीस युनिफॉर्म, बेल्ट, कप, युनिफॉर्मवर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आढळून आले, तसेच त्याच्या घरातून रेल्वे, पालिका, पोलीसमधील पदाच्या भरती प्रक्रियेची कागपदत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत, तसेच अनेक उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच्या फाइल्सही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.