नागपूर : राज्यातील महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. कर्जाच्या व्याजाची रक्कम शासन भरेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे महिलांच्या विभागीय मेळाव्यात केली.विभागीय क्रीडा संकुलात आयोजित नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील महिला बचत गटाच्या विभागीय मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते.देशाला विकसित करावयाचे असेल तर मातृशक्ती सक्षम करण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर ज्या देशांनी मोठी प्रगती केली त्यामागे मातृशक्तीचा सहभाग होता. आपल्यालाही त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट प्रभावी होणे आवश्यक आहे. महिला बचत गटातर्फे उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे पॅकेजिंग व ब्रँडिग केले तर जगातील मोठ्या कंपन्यांना आपण निश्चितपणे मागे टाकू शकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.यापुढे महिला बचत गटांना वर्षभर वस्तू विकण्यासाठी जिल्हास्तरावर मॉल उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे वैविध्यपूर्ण व दर्जेदार साहित्य निर्माण होईल. यासाठी पहिला मॉडेल मॉल नागपुरात बडकस चौकातील जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज
By admin | Published: February 22, 2016 2:16 AM