मुंबई : वेतन अनुदानाच्या प्रश्नावर शासन उदासीन असल्याच्या निषेधार्थ राज्यातील अशासकीय आयटीआयच्या प्राचार्य, कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यात राज्यातील ४१७ आयटीआयमधील एकूण ७ हजार कर्मचारी आणि प्राचार्यांनी उडी घेतल्याने सुमारे ६५ हजार प्रशिक्षणार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर राज्यातील किमान २००० सालीपूर्वीच्या अशासकीय आयटीआयना अनुदान देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.बोरस्ते म्हणाले की, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील संघटनेसोबत चर्चा करण्यात निरुत्साही दिसत आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय आयटीआयला वेतन अनुदान देण्यास सकारात्मकता दाखवली आहे. मात्र प्रस्तावाअभावी कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे ते वारंवार सांगत आहेत. या आंदोलनाला राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही सक्रिय पाठिंबा दिल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.राज्यभर तीव्र पडसादराज्यात कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणी प्राचार्य, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी मिळून मोर्चे काढल्याचे संघटनेने सांगितले. वेतन अनुदानाचे निवेदन तहसीदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्यवसाय अधिकाऱ्यांना देऊन संघटनेचे प्रतिनिधी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
राज्यातील अशासकीय आयटीआय बेमुदत बंद
By admin | Published: January 12, 2016 2:39 AM