ऑनलाइन लोकमत
मीरा रोड, दि. १६ - 500-1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्या बदलुन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभ्या असलेल्या एका 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. भाईंदर पश्चिमेच्या देवचंद नगर मधील श्रीपाल नगर क्र. 3 या इमारतीत दिपकभाई नरोत्तमदास शाह (53) हे आज सकाळी 7 च्या सुमारास बेसिन कॅथोलिक बँकेत 500 - 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. रांग मोठी असल्याने 9 च्या सुमारास रांगेत उभे असलेल्या दिपकभाई यांना छातीत दुखु लागले व ते चक्कर येऊन पडले. लोकांनी लगेच जवळ असलेल्या डॉ. लिंबाचिया यांच्याकडे नेले असता त्यांनी त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यास सांगीतले. त्यांना नजिकच्या श्रध्दा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगीतले. दिपकभाई हे भुलेश्वर येथे नोकरी करत होते. रोज सकाळी ते 8.21 ची लोकल भाईंदर स्थानकातुन पकडुन पकडत. त्यांना दोन मुली असुन एकीचे लग्न झाले आहे. येथे ते पत्नी व मुली सोबत रहात. 500 - 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने आर्थिक चणचण सुरु होती. सुट्टे नसल्याने घर चालवणे अवघड बनले होते. त्यामुळे ते तणावात होते. गेले 3-4 दिवस ते नोटा बदलण्यासाठी जात होते. तासन तास रांगेत उभे राहुन पुन्हा कामावर जाण्यास उशीर होत होता असे निकटवर्तियांनी सांगीतले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दिपकभाई यांची मुलगी दिशा हिने आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. शाह कुटुंबियांवर काळाने मोठा आघातच केला असुन त्यांचा कर्ता आधारच हरपला आहे. या घटने नंतर बँकेच्या कर्मचारयांनी रांगेत अशी काही घटनाच घडली नसल्याचा दावा करत पत्रकारांना माहिती देण्यारया बँकेच्या रखवालदारास देखील धमकावण्यात आले. विशेष म्हणजे भाईंदर पोलिसांनी देखील या घटनेची नोंद केलेली नाही.