मनोहर कुंभेजकर
मुंबई, दि. १६ - केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. मच्छीमारी खर्च प्रामुख्याने रोखीवरच असल्यामुळे मच्छीमारांचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्यातील समारे ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याचे राज्यातील चित्र असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.मच्छीमारांचा रोजचा व्यवहार हा प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यामतून होता.मात्र केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारास बंदी घातल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सहकारी चळवळच मोडीत निघण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जशी कर्ज माफीची सवलत दिली आहे तशी सवलत देशातील मच्छीमारांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबईतील ससून डॉक,भाऊचा धक्का,छत्रपती शिवाजी मार्केट,दादर मार्केट,मालाड(प)येथील साईनाथ मार्केट येथे रोज ताजी मासळी येते,मात्र नोटा बंदीमुळे येथील होलसेल मासळी व्यवहार ठप्प झाला असून नाशिवंत मासळी सडून जात असल्याची माहिती संधे यांनी दिली.रोज मासेमारीसाठी जायचे की घर खर्चासाठी बँकेत पैशासाठी रांगा मच्छीमारांना लावायच्या या चिंतेत मच्छीमार सापडला असल्याची माहिती संघाचे मुंबई अध्यक्ष विजय वैती आणि रायगड अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. खोल मासेमारीसाठी किमान ५ ते ८ दिवसांसाठी लागणारे डीझेंल,बर्फ,लागणारा कच्चा माल आणि खलाश्यांचा पगार असा मच्छीमारांना खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये येतो.राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून राज्यात ३२८ मच्छीमार गावे असून ३२५ मच्छीमार बंदरे आहेत.तर राज्यात सुमारे ११६६७ यांत्रिक व ८००० बिगर यांत्रिकी बोटी आहेत.मासेमारीच्या निर्यातीतून देशाला वर्षाला सुमारे १२००० कोटी परकीय चलन मिळते.या नोटा बंदीचा मासेमारीच्या निर्यातीला देखिल मोठा फटका बसला असल्याची आकडेवारी संधे यांनी दिली.