कोल्हापूर : एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरचेंबर्स आॅफ कॉमर्सने सोमवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘राष्ट्रीय अर्थव्यवस्था-सद्य:स्थिती व परिणाम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
चिदंबरम् म्हणाले, नागरिकांची क्रयशक्ती, सरकारी धोरणे, निर्यात आणि खासगी गुंतवणूक यावर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. मात्र, सरकार केवळ कर गोळा करण्याच्या मागे लागले आहे. नागरिकांची क्रयशक्ती घटली आहे. निर्यातीचा वेगही कमी झाला असून, खासगी गुंतवणुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे देशातील कोणताही घटक सध्या समाधानी नाही.
युपीए आणि एनडीएच्या कालावधीतील आर्थिक स्थितीची तुलनात्मक मांडणी करताना चिदंबरम् म्हणाले, युपीए १ वेळी ८.0५ टक्के हा विकास दर होता. युपीए २ वेळी तो ७.0५ टक्के होता. मात्र, एनडीएच्या काळात तो ६.0३ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यानंतरही विकासदर वाढत असताना नोटाबंदीचा मोठा चुकीचा निर्णय घेतल्याने पुन्हा त्यात घट झाली. नोटाबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योजक देशोधडीला लागले. काळा पैसा अजूनही निर्माण होत आहे, भ्रष्टाचार कमी झाला नाही आणि दहशतवादी कृ त्ये तर आधीपेक्षा वाढली आहेत.
‘जीएसटी’ची मांडणी आम्ही केली तेव्हा आठ वर्षे भाजपने कडाडून विरोध करत या कराची अंमलबजावणी करू दिली नाही. मात्र, आपणच जीएसटीचे चॅम्पियन असल्याप्रमाणे त्यांनी सत्तेवर आल्यावर तो आमच्याच सहकार्याने मंजूर करून घेतला. मात्र, अतिशय चुकीच्या रचनेमुळे अपेक्षित फायदा होण्याऐवजी पुन्हा एकदा उद्योग, व्यापार क्षेत्राला उद्ध्वस्त करण्यासाठी हा कर कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने बँकिंग क्षेत्रामध्ये अनागोंदी असून आज मोठे कर्ज घेण्यासाठी कुणी तयार होत नाही आणि घेतो म्हणाला तर बँका द्यायला तयार नाहीत. जाणीवपूर्वक बँका बुडविणारे बाहेर पळून गेलेत आणि शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आल्यामुळे कर्ज भरू न शकले त्यांच्यामागे मात्र ससेमिरा सुरू आहे.
चेंबर्स आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी स्वागत केले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले, तर योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संजय शेटे यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रदीप कापडिया यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर येथे चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी सोमवारी आपले विचार मांडले. यावेळी प्रदीप कापडिया, चंद्रकांत जाधव, शरद रणपिसे, शोभा बोंद्रे, सतेज पाटील, ललित गांधी, संजय शेटे, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.