मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकतर्फी दिशाहीन क्षेपणास्त्र असल्याची परखड टीका नोबेलविजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केली. सेन यांनी नोटाबंदीवेळी लोकांना विचारात घेतले नसल्याचे सांगत, अशा क्षेपणास्त्रांचा सरकार वेळोवेळी मारा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.टाटा मेमोरियल रुग्णालयाने ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने कुलाबा येथे शनिवारी आयोजित ‘हेल्थकेअर कमोडिटी आॅर बेसिक ह्युमन नीड?’ या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील खासगी डॉक्टरांकडून गरीब रुग्णांचे होणारे शोषण बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. देशातील राजकीय निर्णयांमध्ये सामान्य नागरिकांच्या मतांवर आधारित असले पाहिजे, असे सांगत, आजच्या घडीला ‘आरोग्यसेवा’ क्षेत्रात सरकारतर्फे सर्वात कमी गुंतवणूक केली जात असल्याचे स्पष्ट केले. आरोग्यसेवा क्षेत्रात प्रगती होण्यासाठी राज्य शासनाने परिपक्व भूमिका घेतली पाहिजे, असे सेन यांनी सुचविले.आपल्या देशात अजूनही आरोग्यसेवा क्षेत्रात उत्तम सेवा- सुविधा पुरविल्या जात नाही, ही देशाची सर्वांत मोठी हार असल्याची बाब सेन यांनी अधोरेखित केली. आपल्या देशाचे दरडोई उत्त्पन्न जास्त असून, आरोग्यसेवा क्षेत्रात पाकिस्तानसारख्या देशानंतर आपले नाव घेतले जाते, ही गांभीर्याची बाब असल्याचे सेन यांनी म्हटले. बांग्लादेश आणि नेपाळ हे दोन्ही देश भारताच्या तुलनेत आरोग्यसेवा क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे सर्वांत गरीब अर्थव्यवस्था असणारा बांग्लादेश आरोग्यसेवा क्षेत्रात बालमृत्यू, लसीकरण, स्वच्छताविषय सुविधा, कुपोषण आणि शौचालयांची उपलब्धता या सर्वच बाबतीत भारतापेक्षा आघाडीवर आहे. आरोग्यसेवेविषयी बोलताना सेन यांनी देशात आर्थिक प्रगतीचा सामाजिक परिणाम मर्यादित ठेवल्यास, आरोग्यसेवा क्षेत्राचा विकास होण्यास निश्चित मदत होईल असे त्यांनी सांगितले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेन यांनी आरोग्यसेवा क्षेत्राकडे राजकीय पक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची गंभीर टीका केली, तसेच गेली २५ वर्षे आर्थिक विकासाच्या ‘शिड्या’ चढणारा भारत आरोग्यसेवा क्षेत्रात मात्र, ‘सापा’च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (प्रतिनिधी)१८ वर्षांचा असताना कर्करोगाची लागण अमर्त्य सेन यांनी आपल्या देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्राची दयनीय स्थिती सांगताना स्पष्ट केले की, ‘मी १८ वर्षांचा असताना कर्करोगाची लागण झाली होती. त्या वेळीस केवळ ५ वर्षे जगू शकेन, असे डॉक्टरांनी सांगितले होते. १५ टक्के जगण्याची आशाही डॉक्टरांनी व्यक्त केली होती, याला आता ६४ वर्षे उलटली आहेत.’
नोटाबंदी म्हणजे एकतर्फी दिशाहीन क्षेपणास्त्र
By admin | Published: January 29, 2017 1:48 AM