नाशिक - देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या मोहिमेत नुकताच लसीचे १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये देशाने मिळवलेले हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. मात्र या १०० कोटी लसीकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
एकीकडे लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर काश्मीरमध्ये हत्याकांड होत आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जातात, अशी टीकाही राऊत यांनी केली. देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी काही बोलत नाही, असेही ते म्हणाले.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिला होता आणि आहे. आगामा महानगरपालिका निवडणुकीत आम्ही येथे शिवसेनेची सत्ता आणू. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आकडा हा १०० आमदारांच्या पुढे गेला पाहिजे. नाशिक शहरामध्ये सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही याचीही खंत आपल्याला वाटली पाहिजे, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील भाजपाचे सरकार घालवले. आता दिल्लीकडे कूच करायची आहे. मात्र देशात महाविकास आघाडी म्हणनू नाही तर शिवसेना म्हणून जाणार आहोत. राज्यातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची झोप उडाली आहे. मात्र त्यांना सत्तेबाहेर काढल्यापासून आम्हाला शांत झोप लागते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
आज आपल दादरा नगर हवेली येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहोत. तिथे आपला उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. त्यानंतर गुजरात आणि इतर राज्यातील निवडणुकाही आम्ही लढवणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचं नेतृत्व द्यायचं असेल तर शिवसेनेचे आमदार, खासदार वाढले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.